मराठी नाट्यविश्वात चैतन्य निर्माण करून प्रेरणा, प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या उद्देश्याने प्रतिवर्षी आयोजित केला जाणारा ‘प्रतिबिंब: मराठी नाट्योत्सव हा यंदाच्या उन्हाळी सुट्टीत म्हणजे दिनांक ५ ते ७ मेच्या दरम्यान एनसीपीएमध्ये आयोजित केला जात आहे. याबाबत एनसीपीएचे थियेटर आणि फिल्म विभागाचे प्रमुख ब्रूस गथ्री ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगतात ’ यंदाच्या प्रतिबिंब मराठी नाट्योत्सवाचा शुभारंभ हा दर्पण पारितोषिक विजेत्या नाटकाने होणार आहे. २०२२ साली झालेल्या नाट्य उत्सवाच्यावेळी असे जाहीर केले होते कि अशा प्रकारच्या नाट्य उत्सवाचा एक भाग म्हणून नवीन कलाकृतींना प्रोत्साहन दिले जाईल. तंत्रशुद्ध नाट्यलेखन केले जावे आणि आपल्या मातीतील नवनवे विषय-आशय मांडणाऱ्या संहितांना आवश्यक ती मदत करून त्यांना सादर करण्याची संधी मिळावी. याकरिता एनसीपीएच्या मराठी नाट्यविभागासाठी शिल्पा कुमार ह्यांनी उत्साहपूर्वक केलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आहोत.’
विविध प्रकारची नाटके,अभिवाचन, तसेच एनसीपीएचे कार्य जाणून घेण्यासाठी विशेष टूर, भाषणे आणि मराठी रंगभूमीवरील मान्यवरांचे नाट्यविषयक चर्चासत्र असे अनेक कार्यक्रम या तीन दिवसीय नाट्योत्सवात सादर होणार आहेत. आजच्या घडीला लोकप्रिय असलेल्या व्यावसायिक नाटकांचे तसेच प्रायोगिक नाटकांचे प्रयोग नामांकित नाट्यसंस्था आणि उगवत्या नाट्य-ग्रुप्सतर्फे सादर होतील.
दर्पणसाठी निवड केलेल्या नाटकाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याची संहिता ही एनसीपीएच्या नव्या लेखन उपक्रमाद्वारे निवडण्यात आलेली आहे. तसेच नाट्यनिर्मितीचे नियोजन व प्रत्यक्षातील सादरीकरण प्रक्रिया पद्धतशीरपणे करण्यात आली. ह्याबाबत अधिक माहिती देतांना गथ्री पुढे म्हणतात,’ या लेखन उपक्रमासाठी एकूण ५५ नाट्य-संहितांची निवड करण्यात आली होती. आमच्या तज्ञांच्या समितीने अनेकदा वाचन करून, पुनर्वाचन करून आपसांत चर्चा करून एका सर्वोत्तम संहितेची निवड केली, ज्याचा प्रथम प्रयोग या नाट्योत्सवात सादर होईल. आम्हाला जाहीर करण्यास आनंद होतो आहे कि यंदाच्या एनसीपीए प्रतिबिंब नाट्योत्सवाचा शुभारंभ हा दर्पण विजेत्या –कलगीतुरा या दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित नाटकाद्वारे होणार आहे.
नक्की वाचा: ‘सरी’तील ‘मला का भासे’ हे प्रेमगीत प्रदर्शित
मराठी भाषा न बोलणाऱ्या प्रेक्षकांनीदेखील या नाट्योत्सवात सादर होणारी नाटके पहावीत हादेखील एनसीपीएचा हेतू आहे ह्याबाबत गथ्री सांगतात’ गेल्या वर्षीच्या नाट्योत्सवाप्रमाणे यंदादेखील आम्ही सर्व नाटकांसाठी इंग्रजीमध्ये सबटायटल्स देणार आहोत. ज्यामुळे मराठी प्रेक्षकांव्यातिरिक्त सर्व प्रकारच्या अन्य भाषिक प्रेक्षकांना या उत्तमोत्तम मराठी नाटकांचा आनंद घेता येईल. यावर्षीच्या नाट्योत्सवाचे वैशिष्ठ्य म्हणजे अधिक प्रमाणात मास्टरक्लासेस, भाषणे, नाट्य-वाचन आणि नाट्यप्रयोगाच्या बरोबरीने मराठमोळ्या पदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. आमचा हेतू हा कि समृद्ध परंपरा असलेल्या मराठी रंगभूमीचे प्रेक्षकांना दर्शन घडवणे आणि त्याचबरोबरीने नव्या मंडळींचे उल्लेखनीय काम तुम्हाला दाखवणे’.
प्रतिबिंब या नावाप्रमाणे महाराष्ट्राच्या नाट्य-परंपरेला साजेशी तसेच आजच्या काळातील विषय मांडणारी विचारप्रवर्तक नाटके या नाट्योत्सवात दाखवली जाणार आहेत. तेव्हा रसिक प्रेक्षकानो, येत्या ५ मे ते ७ मे च्या दरम्यान एनसीपीएमध्ये होणाऱ्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या गौरवशाली नाट्यकलेच्या सोहळ्यात- नाट्योत्सवात जरूर सहभागी व्हा.