गब्बर सिंग : बॉलिवूडचा पहिला क्रूर, निर्दयी आणि अनअपोलोजेटिक खलनायक

Amjad Khan as Gabbar Singh in Sholay

जसा चित्रपटाचा इतिहास ‘शोले’ या अजरामर चित्रपटाच्या उल्लेखाशिवाय होऊ शकत नाही. अगदी तसंच मनोरंजनसृष्टीतील नकारात्मक पात्रांचा आढावा घ्यायचा ठरलं तर ‘गब्बर सिंग‘ या पात्राशिवाय आपण पुढे जाउच शकणार नाही. शोले हा जसा मैलाचा दगड ठरला तसंच नकारात्मक भूमिकांमध्ये गब्बर सिंग हे पात्र एक मैलाचा दगड ठरलेलं आहे. या पात्राने चित्रपटातील खलनायकाला पूर्णपणे बदललं. याचं संपूर्ण श्रेय जातं ते म्हणजे अभिनेते अमजद खान यांना. (Gabbar Singh)

अमजद खान यांचं गब्बर सिंगसाठीचं डबिंग आपल्या महागुरूंनी करवून घेतलं आणि मगच ते फायनल झालं असं स्वतः महागुरुच नॅशनल टेलिव्हिजनवर बोलले आहेत. त्यांच्या त्या ‘मॉडेस्ट’ आणि ‘सेल्फलेस’ स्वभावाचा मान ठेवून गब्बर सिंग साठीचं श्रेय हे मी तरी किमान केवळ अमजद खान (Amjad Khan) आणि त्या पात्राचे जन्मदाते सलीम खान आणि जावेद अख्तर यांना देतो.

Image Credit: Google

१९७५ साली आलेल्या चित्रपटातील एका पात्राचं नाव घेऊन आजच्या काळातील सुपरस्टार एक चित्रपट घेऊन येतो आणि तो हीट ठरतो ही गोष्टच हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे की गब्बर सिंग हे पात्र अजरामर आहे. ‘गब्बर सिंग’ हे पात्र साकारण्याआधी अमजद खान यांनी काही चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं, त्यानंतर नाटकाच्या माध्यमातून सिप्पी यांची नजर अमजद यांच्यावर पडली आणि मग त्यांना त्यांचा गब्बर सापडला. या पात्रासाठी डॅनी डेन्झोंग्पा यांना सुद्धा विचारण्यात आलं होतं, यात काहीच संदेह नाही की त्यांनीसुद्धा हे पात्र तितक्याच बखूबी निभावलं असतं, पण अमजद खान यांनी या पात्राला ज्या ऊंचीवर नेऊन ठेवलं आहे तितकं कदाचित डॅनी यांनाही जमलं नसतं.

‘गब्बर सिंग’च्या आधीचे खलनायक हे ठराविक साच्यातील होते. अमजद यांनी ‘गब्बर सिंग’ला जो एक रॉ लूक तर दिलाच पण एका डाकूच्या देहबोली आणि मानसिकतेमध्ये सुद्धा त्यांनी एक वेगळेपण आणलं. ‘गब्बर सिंग’ची खासियत होती ते म्हणजे त्याचं अनअपोलोजेटिक असणं, तो क्रूर होता, उलट्या काळजाचा होता, पण तो जे करायचा त्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. कदाचित त्या काळात अशाच एका पात्राची आवश्यकता होती. (Amjad Khan as Gabbar Singh in Sholay)

‘शोले’मधला अंगावर काटा आणणारा सीन म्हणजे जेल तोडून बाहेर पडल्यावर गब्बर ठाकूरच्या घरी जाऊन त्याचा परिवार संपवतो. तो सीन आजही बघताना आपला थरकाप उडतो. खासकरून जेव्हा तो लहान मुलगा गब्बरसमोर येतो, गब्बर घोड्यावर असतो, घरच्या अंगणात पडलेले मृतदेह, चारही बाजूंनी डाकू, मध्ये केवळ झोपाळ्याचा कर्कश आवाज अन् एका बाजूला तो मुलगा आणि दुसऱ्या बाजूला घोड्यावर बसलेला गब्बर आणि त्यानंतर जे घडतं ते बघताना आजही आपण नकळत डोळे बंद करतो, ते दृश्यं आपल्याला बघवत नाही. हीच खरी मेख आहे लेखकांची आणि ते पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याची. त्या एका सीनमध्ये गब्बरचा क्रूरपणा इतका ठासून भरला आहे की त्यानंतर आपल्या मनात त्याच्याबद्दल तसूभरही सहानुभूती रहात नाही. 

Image Credit: Google

शोलेमध्ये (Sholay) सलीम जावेद यांनी जितकी मेहनत गावातल्या कापूस पिंजणाऱ्याच्या कामावर घेतली आहे तितकीच किंबहून त्याहीपेक्षा जास्त मेहनत गब्बरवर घेतली आहे हे आपल्याला शोले बघताना नेहमी जाणवतं. अर्थात लेखकांप्रमाणेच अमजद खान यांनीदेखील ते पात्र तितक्याच इमानदारीने निभावलं आहे त्यामुळेच गब्बर हा कितीही क्रूर, ऊलट्या काळजाचा असला तरी आजही आपल्याला तो बघायला आवडतो.

त्याचं ते कुत्सित हसणं, त्याचा तो राग, बसंतीकडे जाणारी त्याची घाणेरडी नजर, ठाकूरचे हात छाटताना त्याला होणारा असुरी आनंद इथपासून ते अगदी ठाकूरच्या खिळे ठोकलेल्या बुटांनी तुडवून घेऊन पोलिसांच्या ताब्यात येणं हे सगळं आपल्याला पुन्हा पुन्हा बघायला आवडतं.आज आपण जे खलनायक बघतो आहोत त्यांचा पाया हा कुठेतरी शोलेमधल्या गब्बरने रचला आहे. सलीम जावेद यांनी हे पात्र लिहिलं नसतं आणि अमजद खान यांनी ते तितकं प्रभावीपणे साकारलं नसतं तर आजचेही खलनायक एकाच साच्यात अडकून राहिले असते.

Spread the love

Related posts

‘सत्या’ की ‘कंपनी’: राम गोपाल वर्मा यांचा ‘खरा’ कल्ट क्लासिक सिनेमा कोणता?

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

EXCLUSIVE: Chhaya Kadam on bagging Grand Prix for All We Imagine as Light; says, “The role was written for me”

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More