Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार एका नव्या आणि दमदार रिएलिटी शोसह प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या शोचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ असं या शोचं नाव असून, या शोमधून सर्वसामान्य लोकांना आपलं नशीब आजमावण्याची आणि आयुष्य बदलण्याची मोठी संधी मिळणार आहे. शोचा प्रोमो सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
प्रोमोमध्ये दाखवण्यात येतं की, एक वकील मृत्यूपत्राचं वाचन करत आहे. समोर संपूर्ण कुटुंब बसलेलं आहे, तर अक्षय कुमार एका नोकराच्या भूमिकेत दिसतो. मात्र कथेत अनपेक्षित वळण येतं, जेव्हा कोट्यवधींची संपत्ती मालकाच्या मुलाच्या नावावर न करता नोकर रामूच्या नावावर केल्याचं उघड होतं.
यानंतर रामू बनलेला अक्षय कुमार आपल्या हुशारीने ‘राम’ऐवजी ‘रामू’ असं लिहून घेतो आणि सगळा खेळ पालटतो. प्रोमोमध्ये अक्षय कुमार म्हणतो, “एक ऊकार सगळं बदलू शकतो. शब्दांची कारीगरी जादू करू शकते. आता एक-एक अक्षर महत्त्वाचं ठरणार, जेव्हा हा जादूचा चक्कर फिरणार.” एका बंगल्यातला नोकर कसा मालक बनतो आणि मालक कसा नोकर होतो, हे या प्रोमोमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे.
लवकरच सोनी टीव्हीवर ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ हा नवा रिएलिटी शो सुरू होणार असून, या शोचं सूत्रसंचालन स्वतः अक्षय कुमार करणार आहे. हा शो अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय रिएलिटी शो असून त्याला तब्बल ८ एमी पुरस्कार मिळाले आहेत. शोची नेमकी रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नसली, तरी अक्षय कुमारच्या या टीव्ही कमबॅकबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
=====
हे देखील वाचा : सलमान खानची मोठी घोषणा: बिग बॉस मराठी सिझन ६ चं सूत्रसंचालन पुन्हा रितेश देशमुखकडे!
=====