अगदी सुरुवातीपासूनच मराठी सिनेमे सतत प्रेक्षकांना वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात. मराठी चित्रपटांमध्ये सतत विविध प्रयोग होताना आपण बघत असतो. अशातच आता आपल्याला लवकरच ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’ या सिनेमामध्ये असाच एक हटके प्रयोग बघायला मिळणार आहे. सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’ या सिनेमाची बरीच चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे. अतिशय हुशार आणि प्रतिभासंपन्न अशा सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका सिनेमात असणार आहे. सोनाली नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांच्या शोधात असते आणि अशा भूमिका घेऊनच ती प्रेक्षकांसमोर येते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’ या सिनेमातून देखील ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
‘शॉर्ट अँण्ड स्वीट’ या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधून सिनेमात असलेले नावीन्य आणि हटके विषय याबद्दल प्रेक्षकांना थोडी कल्पना नक्कीच आली आहे. सिनेमाचा विषय हा या सिनेमाचे एक वैशिष्ट्य आहे. मात्र यासोबतच एक खास बाब म्हणजे या सिनेमात सोनालीचे आईबाबा देखील एका छोट्या मात्र खास भूमिकेत दिसणार आहे.
‘शॉर्ट अँण्ड स्वीट’ या सिनेमाची ट्रेलर आल्यानंतर कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे. सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून यात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे. तर हे नवोदित कलाकार आहेत सोनाली कुलकर्णीचे आई – बाबा. गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
या सिनेमामध्ये सोनालीच्या आई बाबांना अगदीच सहज या सिनेमात अभिनय करण्याची संधी मिळाली. सिनेमाचे पुण्यात चित्रीकरण असल्याने सोनालीचे आई-बाबा तिला एकदा सहजच सेटवर भेटायला गेले होते. त्यावेळी बसमधील प्रवास करतानाचा सीन चित्रीत होत होता. सोनालीचे आई-बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची संधी स्विकारली.
सोनालीचे आई बाबा ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद काही औरच असल्याचे सोनलीच्या आई-बाबांनी सांगितले. लेकीसोबत काम करण्याचा आनंद आणि सोबतच तिचा अभिमान वाटत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर सोनालीलाही आपल्या आईबाबांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल असल्याचे म्हटले आहे.
शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.