महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला माहित झालेले आणि ओळखीचे नाव म्हणजे प्रसाद खांडेकर. आपल्या भन्नाट अभिनयाने, विनोदी बुद्धीने आणि लेखनाने त्याने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहे. प्रसादचे अभिनय आणि लिखाण कौशल्य तर सगळ्यांना माहीतच झाला आहे. मात्र आता तो एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. लवकरच प्रसाद चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. तो चित्रपट नुसता अभिनयच करणार नसून त्या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील करणार आहे.
‘एकदा येऊन तर बघा’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. हा सिनेमा कुटुंबावर आणि त्यातील माणसांवर भाष्य करतो. आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात. आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी साध्य करता येतात. एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब २४ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येत आहे.
श्रावण, फाल्गुन आणि कार्तिक या तीन भावांची ही गोष्ट आहे. फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसाय सुरु तर करतात पण ग्राहक यावेत यासाठी त्यांना काय आणि किती प्रयत्न करावे लागतात? ज्या गिऱ्हाईकांची वाट बघत आहेत ते गिऱ्हाईक हॉटेल मध्ये आल्यावर हे कसे एका प्रॉब्लेम मध्ये अडकत जातात आणि मग पुढे काय होतं ? त्यातून त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग ओढवतात आणि त्याला ही मंडळी कशी सामोरी जातात? याची गमतीशीर गोष्ट म्हणजे ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट.
गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने फुलंब्रीकर कुटुंबात पहायला मिळणार आहेत. या पाच जणांसोबत सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठी फौज चित्रपटात आहे. हे कुटुंब तुम्हाला निखळ हास्याची मेजवानी देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रसाद खांडेकर व्यक्त करतात. २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.