प्रभावी अभिनेते अशी ओळख असलेल्या मिलिंद शिंदे यांना आपण आजवर अनेक नानाविध भूमिकांमध्ये पाहिले आहेत. खासकरून त्यांच्या खलनायकी भूमिका कमालीच्या गाजल्या. मिलिंद यांना मालिकेत पाहिल्यानंतर त्यांचा रोल नकारात्मकच असणार हे सगळेच लोकं ठरवून टाकतात. अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मिलिंद यांना आता नवीन मालिकेत नव्या हलक्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.
अनेक यशस्वी भागांनंतरही ‘गाथा नवनाथांची’ ही सोनी मराठीवरील मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सध्या बाल नागनाथांच्या भूमिकेत आरूष बेडेकरचा कमाल अभिनय प्रेक्षक अनुभवत आहेतच. त्यातच आता बाल नागनाथांना काटशह देण्यासाठी गुरुआईचा प्रवेश गावात झालेला पाहायला मिळतोय.
विशेष म्हणजे गुरुआई या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांची निवड केली गेली आहे. ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आजवर सादर झालेल्या व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारे कलाकार यांची उत्तम निवड हे सोनी मराठीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेच्या यशाचं गमक आहे.
सोनी मराठीवरील ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत सध्या घमासान युद्ध परिस्थिती रंगली आहे. हे युद्ध बाल नागनाथ आणि गुरुआई यांमध्ये घडताना दिसतंय. बाल नागनाथांनी गावाचे रक्षण तसेच उद्धार करण्याचा विडा उचललेला आहे. पण बाल नागनाथांचे समाजकार्य आणि गावकऱ्यांच्या मनामधील त्यांच्याविषयीची वाढत जाणारी आस्था, आपुलकी गावातील पाटलांच्या नजरेत खुपते आहे.
बाल नागनाथांचा बंदोबस्त करण्यासाठी पाटील गुरुआईला बोलावणं धाडतात, पण बाल नागनाथ गुरुआईचा प्रत्येक वार निकामी करताना दिसताहेत. पाटलांच्या सांगण्यावरून षडयंत्र रचणारे गुरुआई हे पात्र मिलिंद शिंदे या सुप्रसिद्ध अभिनेत्याने रंगवले असून आपल्या अनेकविध भूमिकांनी लोकपसंतीस उतरणारे मिलिंद शिंदे सोनी मराठीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतील ‘गुरुआई’ या भूमिकेद्वारा प्रेक्षकांच्या पसंतीस पुन्हा एकदा पात्र ठरतील यात काहीच शंका नाही.
बाल नागनाथ म्हणजेच आरूष बेडेकर आणि गुरुआई म्हणजेच अर्थात मिलिंद शिंदे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं खरोखरीच रंजक आहे. मिलिंद शिंदेनी आजवर अनेक भूमिका गाजवल्या आहेत, पण सध्या या मालिकेत त्यांनी साकारलेली गुरुआई ही भूमिका आणि त्यांनी या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. अंगावर हिरवीकंच साडी.. डोक्यावर पदर.. कपाळावर हळद कुंकवाचा भला मोठा टिळा आणि गळ्यात घातलेलं डोरलं.. नेमकं यातून काय निर्देशित करण्याचा प्रयत्न आहे, हे रहस्य लवकरच उलगडणार आहे.
गुरुआई केवळ पाटलांच्या सांगण्यावरून बाल नागनाथांच्या मार्गात अडथळे घालतेय की आणखीसुद्धा काही रहस्ये त्यामागे दडली आहेत, यांचा उलगडा लवकरच होणार असून त्याकरिता सोनी मराठीवर सोम. ते शनि. संध्या. ६.३० वा. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका पाहणं अजिबात चुकवू नका.