‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेने तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचं प्रेम मिळवलं आहे. त्याचं एक हृदयस्पर्शी उदाहरण नुकतंच मालिकेच्या सेटवर घडलं.
सध्या मालिकेत मंजूला गोळी लागल्याचा धक्का बसवणारा प्रसंग दाखवण्यात आला. तो पाहून सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी गावात राहणारे ८४ वर्षीय दत्तू कर्णे इतके अस्वस्थ झाले की, कोणालाही काही न सांगता थेट साताऱ्यात पोहोचले.
सातारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी विचारलं, “मंजू कशी आहे? ती बरी आहे ना?” हे ऐकून उपस्थित पोलीस अधिकारीही थबकले. पोलीस उपनिरीक्षक अशोक सावंजी आणि कॉन्स्टेबल अनिल सावंत यांनी त्यांच्या भावना समजून घेत ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या सेटवर पोहोचण्याची खास व्यवस्था केली.
सेटवर पोहचल्यावर आजोबांनी अभिनेत्री मोनिका राठी म्हणजेच ‘मंजू’चा हात पकडून तिची विचारपूस केली. तेवढ्यावरच न थांबता सत्याच्या भूमिकेतील कलाकाराला सुनावलं आणि इतर कलाकारांनाही खऱ्याखुऱ्या व्यक्तिरेखा समजून स्पष्ट मत मांडली! हा सगळा प्रसंग इतका भावूक होता की, संपूर्ण युनिटला अश्रू अनावर झाले.
दरम्यान, आजोबा घरच्यांना न सांगता निघाल्याने त्यांचं कुटुंब चिंतेत होतं. मात्र पोलिसांनी कुटुंबाला माहिती दिली आणि मालिकेच्या टीमने आजोबांशी प्रेमाने संवाद साधत त्यांना सन्मानपूर्वक घरी परत पाठवण्याची पूर्ण व्यवस्था केली.
या घटनेवर अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली, “माझ्यासाठी हे फार मोठं आहे. मला गोळी लागली म्हणून ८४ वर्षांचे आजोबा थेट सेटवर आले, हे ऐकून आणि पाहून आम्ही सगळे भावूक झालो. प्रेक्षक मालिकेशी इतके जोडले गेलेत हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने यश आहे.”
‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका आता फक्त कथा न राहता, प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडली गेली आहे. पात्रांमधील भावना, प्रसंग इतके खरे वाटतात की, प्रेक्षक त्यात गुंतून राहतात.
प्रेक्षकांचं हे निखळ प्रेम हेच ‘सन मराठी’ आणि ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या संपूर्ण टीमसाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे!